आपल्या अकलेचं जाहीर दिवाळं निघत असतानाही… रोहित पवारांनी भाजपला धुतलं

अहमदनगर : युक्रेन आणि रशिया यांच्यात आठव्या दिवशीही युद्ध सुरूच आहे. अनेक भारतीय अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत, ज्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. बुधवारी, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने दोन सूचना जारी केल्या होत्या, ज्यात भारतीयांना खार्किव सोडण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना खार्किव्ह सोडण्यासाठी रशियाने युद्ध सहा तासांसाठी थांबवल्याच्या वृत्ताचे खंडन केले.

खार्किवमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त होते. परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्तांचे खंडन करत आमच्या विनंतीवरून युद्ध थांबलेले नाही असे म्हटले आहे. “युद्ध आमच्या सांगण्यावरून थांबेल असे नाही. हे म्हणजे आमच्या सांगण्यावरून पुन्हा बॉम्बफेक सुरू होईल की काय, असे आहे. मी या अहवालांवर भाष्य करू शकत नाही,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून या संदर्भात एक ट्विट करण्यात आले होते. ‘हा नवीन भारत आहे! युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी 6 तास रशियाने युद्ध थांबवलं.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांच्याशी बोलल्यावर हे शक्य झालं. रशियन एअरफोर्स विमान व सैनिकी वाहनाने बाहेर काढण्याचं जाहीर केलं.’ अशा आशयाचे ट्विट महाराष्ट्र भाजपने केले आहे. मात्र परराष्ट्र मंत्रालयानेच भाजपचा खोटारडेपणा उघड केल्यानंतर देखील हे ट्विट बातमी लिहिण्यापर्यंत तरी डिलीट करण्याचं शहाणपण भाजपला सुचलेलं नव्हतं.

यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील भाष्य करत भाजपला चांगलाच फैलावर घेतलं आहे. ‘राजकीय फायद्यासाठी लोकांवर रेटून खोटं लादायचं, हा ‘नवीन भारता’तील भाजपचा जुनाच अजेंडा आहे, यात काही विशेष नाही… पण आपल्या अकलेचं जाहीर दिवाळं निघत असतानाही ट्विट डिलीट न करण्याची हिम्मत दाखवणाऱ्या महाराष्ट्र भाजपला मानलं पाहिजे!’ असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.