महाविकास आघाडी हे सरकार आहे की पोरखेळ ? ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीस संतापले

मुंबई – ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. या घडामोडी घडल्यानंतर विरोधीपक्ष चांगलाच आक्रमक झाला असून महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असल्याचे चित्र दिसत आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी तयार केलेला अहवाल राज्य सरकारने पुरेसा अभ्यास करून तयार केलेला नाही आणि त्यात संशोधनाचा सुद्धा अभाव आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण नाकारण्याच्या दिलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा ओबीसी समाजावर आघात झाला आहे असं ते म्हणाले,

पुढे बोलताना ते म्हणाले, आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर महाविकास आघाडी सरकार प्रारंभीपासूनच गंभीर नव्हते आणि आजही नाही.वारंवार वेळकाढू धोरण अवलंबिले गेले. 5 मार्च 2021 पासून ते आजपर्यंत केवळ आणि केवळ टोलवाटोलवी केली गेली. महाविकास आघाडी हे सरकार आहे की पोरखेळ ?

राज्य सरकारने आता तरी गंभीर व्हावे ! पण ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याला आमचा तीव्र विरोध असेल. यासाठी कोणताही संघर्ष करावा लागला तरी आम्ही तो करू.भाजपा ओबीसी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील असं त्यांनी ठणकावून सांगितले.