‘जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या बदनामीसाठी हा पडळकरांचा पब्लिसीटी स्टंट’

सांगली : 7 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे असलेल्या साठे चौकात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक झाली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आटपाडीत हा वाद उफाळला होता.

त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ ट्विट करत हा हल्ला सुनियोजित होता असा गंभीर आरोप केला आहे. माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूनं 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगानं डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हमला करुन घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावरचा विश्वास उडाल्यानं बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. रक्षकचं जर भक्षकात सामील झाले असतील तर विश्वास कुणावरती ठेवायचा असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. महाराष्ट्रातील प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातील लढा चालूच ठेवेन, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर यांच्या या आरोपांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत्या. शिवसेना आणि भाजपचे दोन पॅनेल होते. गोपीचंद पडळकर यांचे दोन समर्थक तानाजी पाटील यांच्याकडे गेले. याचा जाब विचारण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर गेले. यावेळी राजू जानकर यांच्या अगांवर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

चुका आपल्याच असताना आपल्याच समाजाच्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या बदनामीचा प्रयत्न आणि पब्लिसीटी स्टंट असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला.