जालन्यात भिशी घोटाळा; लाखो रुपये जमा करून भिशी चालक फरार 

जालना- शहरातील कामगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणारा चंदंनजिरा परिसरातील अरुण इंद्रजीत घुगे वय 42 वर्ष याने त्याच्या मुलाने व पत्नीने गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेला भिशीचा व्यवसाय बंद करून अचानक गायब झाल्यामुळे बीसीची गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. प्रथम दर्शनी सुमारे पाच लाखांचा असलेला हा घोटाळा अनेक कोटींमध्ये जाण्याची शक्यता आहे.

इंद्रजीत राघोजी घुगे यांनी त्यांचे राहते तीन मजली घर देखील इतर एका नागरिकाला विकले आहे. त्याच्याकडून ईसार पावती ची मोठी रक्कमही घेतली आहे परंतु बँकेचे कर्ज असल्यामुळे त्याची रजिस्ट्री देखील होऊ शकत नाही. त्यामुळे सुमारे पन्नास लाखांचा फटका हे घर घेणाऱ्या नागरिकाला बसला आहे .तसेच या परिसरात सुमारे पाचशे लोक या भिशी मध्ये गुंतवणूक करीत असल्याचेही समोर येत आहे .त्यामुळे आज प्रथम दर्शनी पाच लाखांचा असलेला हा घोटाळा दीड दोन करोड पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जालना औद्योगिक वसाहतीच्या दुसऱ्या बाजूला चंदंनजिरा नावाने मोठी वसाहत आहे .याच भागात गेल्या पंधरा वर्षांपासून या भागात तीन मजली इमारती मध्ये राहणाऱ्या इंद्रजीत राघोजी घुगे वय 42, त्याचा मुलगा अरुण इंद्रजीत घुगे आणि पत्नी मनकर्णाबाई इंद्रजीत घुगे हे तिघे जण इथे राहत होते. तीन मजली इमारतीमध्ये तळमजल्यावर मोठे किराणा दुकान आहे दुसऱ्या मजल्यावर कपड्याचे दुकान आहे आणि तिसऱ्या मजल्यावर ते राहत होते. तळमजल्यावरील किराणा दुकानात बसून इंद्रजीत घुगे हा बीसी चालवण्याचा व्यवसाय करत होते. गेल्या तीन वर्षांपासून सुरळीत सुरू असलेला हा बीसी चा व्यवसाय चांगलाच वाढला होता. त्यामुळे परिसरातील सुमारे पाचशे लोकांनी या व्यवसायात गुंतवणूक केली.

यामध्ये अमोल गजानन वायाळ, राहणार सुंदर नगर चंदंनजिरा यांनीदेखील मोठी गुंतवणूक केली. ते व्यवसायिक असल्यामुळे मोठी रक्कम आपल्या हातात एकदाच येणार नाही आणि बीसीच्या माध्यमातून ती मिळवता येऊ शकेल, या आशेने त्यांनी इंद्रजीत घुगे आणि त्याच्या परिवाराकडे 75 सदस्य असलेली 38 महिन्यांची पाच हजार रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे तीन लाख 75 रुपये प्रति महिना आणि सदस्यांना पाच हजार रुपये प्रति महिना असलेली भिशी सुरू केली होती. त्यानुसार आतापर्यंत तीन लाख चाळीस हजार रुपये वायाळ यांनी घुगे यांच्याकडे जमा केले आहेत. दिनांक 10 सप्टेंबर 2020 पासून आणखी एक 50 सदस्य असलेली पन्नास महिन्यांची आणि प्रत्येकी तीन हजार रुपये व्यक्ती असे एकूण दीड लाख रुपयांची दुसरी भिशी सुरू केली होती. या बीसीचे पंचेचाळीस हजार रुपये असे एकूण चार लाख 85 हजार रुपये या प्रकरणातील तक्रारदार अमोल गजानन वायाळ यांनी चालक इंद्रजित घुगे यांच्याकडे जमा केले होते.

दरम्यान दिनांक 21 डिसेंबर पासून इंद्रजीत घुगे, अरुण घुगे, आणि मंकरणा घुगे हे घराला कुलूप लावून गायब झाले आहेत. यासंदर्भात अमोल वायाळ यांनी या तिघांच्याही भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क केला मात्र अद्याप पर्यंत तो फोन बंदच आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री अमोल वायाळ यांची झाल्यामुळे त्यांनी चंदंनजिरा पोलीस ठाणे गाठून शनिवार दिनांक 25 रोजी फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच वायाळ यांच्यासोबत नंदू दाभाडे ,अमोल कस्तुरे, शेख अजहर, शेख,रुऊफ , भारत खंदारे ,आदींचाही विश्वास घात करून घुगे याने पैसे हडप करून फरार झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांनी भादवि कलम 420 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्था हितसंबंध संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे चंदंनजिरा परिसरातील अनेक नागरिकांनी आज सकाळपासूनच पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. पोलिसांनी सर्व प्रकरणाची शहानिशा करून रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.