‘मंत्री तुम्ही तुमच्या घरी’ डॉ. नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटील यांना झापलं

Mumbai – राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. दोन्ही सभागृहात विरोधक आणि मंत्री यांच्यात वाकयुद्ध रंगताना पाहायला मिळत आहे. विधान परिषदेत आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर उपसभापती निलम गोऱ्हे चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या.
शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी "मंत्री तुम्ही तुमच्या घरी, अशा शब्दांत निलम गोऱ्हे यांनी भर सभागृहात गुलाबराव पाटील यांना सुनावलं आहे. तसंच सभागृहात बोलण्याच्या आक्रमक पद्धतीवरुनही त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना ताकीद दिली.

विधानपरिषदेत आज शिक्षण विभागाच्या चर्चेत मंत्री दीपक केसरकर यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त करीत गदारोळ केला. या गदारोळात सभापती गोऱ्हे सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत असतानाच मंत्री गुलाबराव पाटील उभे राहिले व निवेदन करू लागले. त्यांच्या निवेदनाने गदारोळ अधिकच वाढला. त्यामुळे सभापतींनी त्यांना अक्षरशः खडसावले.