Sandeep Lamichhane: अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आयपीएल खेळलेला क्रिकेटर दोषी

Sandeep Lamichhane: नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिछाने याच्यावर बलात्काराचे आरोप सिद्ध झाले आहेत. मात्र, बलात्काराच्या वेळी पीडित मुलगी अल्पवयीन नव्हती, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पुढील सुनावणीत लामिछाने याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. काठमांडू जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला बलात्कारप्रकरणी दोषी ठरवले. रविवारी सुरू झालेल्या अंतिम सुनावणीच्या समाप्तीनंतर न्यायमूर्ती शिशिरराज ढकल यांच्या एकल खंडपीठाने हा आदेश दिला. मात्र, घटनेच्या वेळी मुलगी अल्पवयीन नव्हती, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.

पुढील सुनावणीत संदीपच्या शिक्षेचा निर्णय होणार आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. 12 जानेवारी रोजी पाटण उच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते. लामिछाने याच्या पुनर्विलोकन याचिकेला उत्तर देताना न्यायमूर्ती ध्रुवराज नंदा आणि न्यायमूर्ती रमेश दहल यांच्या संयुक्त खंडपीठाने त्याची 20 लाख रुपयांच्या नेपाळी जातमुचलक्यावर अटींसह सुटका करण्याचे आदेश दिले होते. काठमांडू जिल्हा न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2022 रोजी कोठडी सुनावणीनंतर लामिछाने याला सुंधरा येथील मध्यवर्ती कारागृहात पाठवण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला लामिछाने यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. काठमांडू जिल्हा मुखत्यार कार्यालयाने 21 ऑगस्ट रोजी लामिछाने विरोधात 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यावर फौजदारी संहिता 2074 च्या कलम 219 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीने 6 सप्टेंबर रोजी महानगर पोलिस सर्कल, गोशाळेत या 22 वर्षीय क्रिकेटपटूविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी लामिछाने कॅरेबियन प्रीमियर लीग खेळण्यासाठी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे होते. नेपाळ पोलिसांनी त्याला 6 ऑक्टोबर रोजी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. आरोपपत्राद्वारे जिल्हा वकिलांनी पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी लामिछाने याच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर लामिछाने याचे बँक खाते आणि मालमत्ता जप्त करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’