हजारो शिक्षकांची झोप उडवणारी बातमी ! शिक्षण विभागाकडे ‘त्या’ शिक्षकांची यादी सुपुर्द

मुंबई : टीईटी गैरव्यवहार प्रकरणात पैसे देऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. फसवणूकीची खातरजमा करून संबंधित शिक्षकांनावर थेट कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यातील सायबर शाखेकडून राज्यातील ७९०० जणांची यादी तयार करण्यात आली आहे. ती यादी आता शिक्षण विभागाकडे पोलिसांनी तपासणीसाठी सुपुर्द केली आहे. शिक्षण विभागातील पाच अधिकारी आणि पुण्यातील पाच पोलीस अधिकारी एकत्र बसून तयार करण्यात आलेल्या याद्यांची तपासणी करणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे पोलिसांनी तपासणी केलेल्या टीईटी परीक्षेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तपासात असं देखील आढळून आलं होतं की, ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण होते. त्यांना देखील पास करण्यात आलं आहे. या परिक्षेत काही विद्यार्थी पैसे देऊन पास झाले होते. तर काही विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्रावर जातीच्या नावामध्ये देखील बदल करण्यात आलं आहे. त्यामुळे या अपात्र शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत १६,५०० जण परीक्षेत पात्र ठरले होते. त्यानंतर निकाल पुन्हा पडताळून पाहिल्यानंतर पुणे पोलिसांना परीक्षेत गैरव्यवहार करणारे ७ हजार ८०० जण हे अपात्र असल्याचं समोर आले. तसेच २०१८ मध्ये देखील पैसे देऊन पात्र ठरवण्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे या परीक्षेसंबंधी काही जणांनी सातत्याने आवाज उठवला होता.

यापूर्वी टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या घरावर धाड टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल आढळून आला. सोने, चांदी, हिरे, जडजवाहीर असा एकुण १ कोटी १ लाख ९५ हजार ८०५ रूपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून टीईटी परीक्षेत घोटाळा करणाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली होती.