Nitin Bangude Patil | जागरूक तरुणच समर्थ राष्ट्र निर्माण करू शकतो;नितीन बानगुडे पाटलांनी व्यक्त केला विश्वास

Nitin Bangude Patil: जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे आज पाहिले जाते. परंतु भारतातील ४२ टक्के तरुण बेरोजगार आहेत. धार्मिकता आणि हिंसाचारातून या तरुणांना भडकवण्याचे काम केले जाते. राजकारणांकडून आपला उपयोग होत आहे, याचा विचार करून आपल्या हक्कांविषयी तरुणांनी कायम जागरूक असले पाहिजे. जागरूक तरुणच खऱ्या अर्थाने समर्थ राष्ट्र निर्माण करू शकतो, असे मत प्रख्यात व्याख्याते नितीन बानगुडे पाटील (Nitin Bangude Patil) यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे न-हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ७ युवा संसदेमध्ये ‘ सशक्त तरुण सशक्त राजकारण आणि सशक्त भारत’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर (Sudhakar Jadwar), उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, युवा पत्रकार निलेश बुधावले, विद्यार्थी प्रतिनिधी सई थोपटे, नवनाथ कांबळे आधी यावेळी उपस्थित होते. यावेळी आदर्श युवा पुरस्कार अक्षय जैन यांना प्रदान करण्यात आला.

नितीन बानगुडे पाटील म्हणाले, दरवर्षी लाखो विद्यार्थिनी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत आहेत, सुमारे ८० लाख विद्यार्थी इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. परंतु सरकार मात्र बियर चा खप कमी झाला म्हणून कमिटी नेमते. अशा सरकारकडून आपण तरुणांच्या विकासासाठी काय अपेक्षा करू शकतो. तरुणांना केंद्रस्थानी मानून जर राज्याचा कारभार आणि राजकारण झाले तरच खऱ्या अर्थाने देश प्रगतीपथावर जाऊ शकतो. राजकारणी आपला विचार करत आहेत हा विश्वास जर तरुणांना वाटला तरच ते राजकारण्यांच्या मागे उभे राहतात.

निलेश बुधावले म्हणाले, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न अनेक लोक करत आहेत, त्यासाठीच मुंबईतील मिरा रोड येथील दंगली चा खोटा व्हिडिओ पसरविण्यात आला, परंतु तरुणांनी मात्र अशा खोट्या बातम्या पासून दूर राहिले पाहिजे. माध्यमांनीही अशा बातम्या देताना जबाबदारी बाळगली पाहिजे. पत्रकारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. गोदी मीडिया आणि चाय बिस्कुट पत्रकार यांच्या मध्ये आज पत्रकार विभागला गेला आहे. परंतु या पलीकडे जाऊनही स्वार्थाच्या पलीकडची पत्रकारिता करता येऊ शकते हे पत्रकारांनी समाजाला दाखवून दिले पाहिजे.

अक्षय जैन म्हणाले, हा देश धर्माच्या आधारावर नाही तर संविधानाच्या आधारावर चालतो हे तरुणांनी लक्षात ठेवले पाहिजे. वारसा हा केवळ तुम्हाला संधी मिळवून देतो. परंतु कर्तुत्व तुम्हाला सिद्धच करावे लागते, असेच शार्दुल जाधवर यांनी स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे आणि त्यांच्यामुळेच युवा संसदेचे यश आपण पाहत आहोत. या युवा संसदेमधून भावी काळातील आमदार खासदार निर्माण व्हावे यासाठी त्यांना राजकारणाची गोडी लावणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी त्यांना राजकारणाची सद्यस्थिती माहित होणे गरजेचे आहे.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, भारताचा खरा विकास हा तरुण सशक्त झाला तरच होणार आहे. प्रथम हाताला काम आणि डोक्याला विचार दिला तर सशक्त तरुण निर्माण होणार आहे आणि त्यातूनच सशक्त राजकारण करून सशक्त देशाची निर्मिती होणे शक्य आहे हा विचार आम्ही या युवा संसदेच्या माध्यमातून तरुणांना देत आहोत. या विचारांतून प्रेरणा घेऊन तरुण राजकारणात सकारात्मक बदल घडवून आणतील असा आम्हाला विश्वास आहे.

महत्वाच्या बातम्या-

देशातील सर्व घटकांना मदत करणारा सर्वसमावेश अर्थसंकल्प – मंत्री छगन भुजबळ

Jayant Patil | निराशाजनक,नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प! जयंत पाटील यांची तिखट प्रतिक्रिया

Interim Budget 2024 | निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की सुटाबुटातल्या मित्रांच्या पलीकडेही हा देश आहे- ठाकरे