संजय राठोडांवर कोणताही गुन्हा नाही, संबंधित तरुणीच्या मृत्यूबाबत समोर आली ‘ही’ माहिती

Pune – संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने शिंदे गट आणि भाजपामध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जाहीरपणे संजय राठोड यांना विरोध केला असून पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपला लढा सुरु राहणार असल्याचंही सांगितलं आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांच्या टीकेला संजय राठोड यांनी उत्तर दिलं आहे.आत्तापर्यंत मी शांत होतो, पण असंच सुरु राहिलं तर मी कायदेशीर मार्ग अवलंबणार, नोटीसही देणार, असा इशारा संजय राठोड यांनी यावेळी दिला आहे. एकाबाजूला हे सर्व घडत असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे पोलिसांनी 8 जूनला संबंधित तरुणींच्या मृत्यूच्या कारणाचा अहवाल दिला होता. या प्रकरणी राठोड यांच्यांवर कोणताही गुन्हा दाखल नाही. तर दुसरीकडे संबंधित तरुणीच्या मृत्यूची वानवडी (Wanawadi) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद आहे, हेदेखील पोलिसांनी सांगितले आहे.पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात तरुणीचा मृत्यू हा अपघात किंवा आत्महत्या असल्याचे समोर आले असून पोलिसांनी आपल्या अहवालात तसे नमूद केले आहे. TV9 ने याबाबत वृत्त दिले आहे.