दारू प्राशन केल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई दिली जाणार नाही – नितीश कुमार

पटना – दारू प्राशन केल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई दिली जाणार नसल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. बिहारमध्ये विषारी दारू प्राशन केल्याने बिहारमध्ये 53 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘जे लोक बनावट दारू पितात, त्यांचा मृत्यू होणारच’ (जो पियेगा, वो मरेगा!) असं विधान केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती.

“दारू प्राशन केल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. आम्ही नेहमीच मद्यप्राशन करू नका, मृत्यू होईल असं आवाहन करत आहोत. मद्यप्राशनाच्या बाजूने बोलणारे तुमचं काही भलं करू शकत नाहीत,” असं नितीश कुमार म्हणाले. तसंच, ही माझी वैयक्तिक इच्छा नसून राज्यातील महिलांच्या आक्रोशाला प्रतिसाद आहे, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.