कुणी काही म्हणो मीच शरद पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे – पाटील

मुंबई – आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि आता अलीकडे झालीय ती ‘नोशनल पार्टी’ आहे असा टोला लगावतानाच त्या पार्टीने मला निलंबित केले काय किंवा ठेवले काय मी शरद पवारसाहेबांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ठणकावून सांगितले.

आज प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पक्षाची भूमिका जयंत पाटील यांनी स्पष्ट केली. त्यांनी केलेल्या कृतीचे समर्थन वेगवेगळ्या प्रकारे करणे त्यांना गरजेचे आहे. त्यांनी ते करत रहावे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे हे सर्वांना माहित आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचे नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

शिंदेचे बरेच आमदार नाराज आहेत. यांच्यामुळे आम्ही उध्दव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडली तीच कारणे परत आमच्या पुढयात आणून ठेवत आहात याबद्दल प्रचंड असंतोष शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांचा आहे असे मला समजले असल्याचे सांगतानाच ज्यांच्या जिल्हयात विरोध केला तेच कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे असंतोष हळूहळू पुढे येईल असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

शरद पवारसाहेब आमच्याचबरोबर आहेत आणि आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत असे सांगून लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यावर मला काही बोलायचे नाही. शरद पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सातारा – कराड येथे स्पष्ट केली आहे. ती महाराष्ट्राला समजली आहे हे स्वयंस्पष्ट आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

थोड्याच दिवसात नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर व इतर काही जिल्हयात पवारसाहेब स्वतः दौरा सुरू करणार आहेत हा झंझावात नाशिक जिल्हयातून सुरु होईल त्याअगोदर दिल्लीत वर्कींग कमिटीची बैठक झाली की हा महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. पवारसाहेबांच्यावर विश्वास ठेवून मतदान केले तिथल्या मतदाराला त्यावेळी लक्षात येईल असे सांगतानाच हा दौरा लवकरच जाहीर करणार आहोत. पाऊस असो अथवा नसो पवारसाहेब बाहेर पडणार आहेत. सातारच्या दौऱ्यावर जसे स्वागत झाले त्याचपध्दतीने महाराष्ट्रात स्वागत जनता व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

कुणी काही म्हणो मीच शरद पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. पवारसाहेब जोपर्यंत म्हणत नाही बाजूला हो तोपर्यंत बाजूला करण्याचा कुणाला अधिकार नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

५३ आमदार आमच्याकडे आहेत त्यापैकी ९ जणांवर आम्ही कारवाई केली आहे. त्यामुळे ५३ वजा ९ हे जे आहे ते माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांना वेगळ्या गटात टाकू नये,त्यांना वेगळी प्रलोभने दाखवू नये, त्यांच्यावर दबाव टाकू नये, सगळ्यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करु द्यावे असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.