जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाचा मार्ग मोकळा; राष्ट्रीय महामार्गं मंडळाला महाराष्ट्र शासनाचा ना हरकत दाखला

करमाळा –  जातेगाव ते टेंभुर्णी रस्त्याला अवश्यक ती नाहरकत राज्य शासनाने या अधिवेशनात दिली आहे,त्यामुळे जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती करमाळा मतदार संघाचे आमदार संजय शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, गेल्या 7 वर्षापासून अहमदनगर- करमाळा – टेंभुर्णी या रस्त्याचे काम रखडले होते. या रस्त्यावरती झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये जवळपास 165 लोकांनी आतापर्यंत प्राण गमावले होते. रस्त्यावरती जागोजागी खड्डे पडल्यामुळे वारंवार अपघात होत होते. या कामाला प्रत्यक्षात 2012 साली मंजुरी मिळाली होती. त्यावेळी हे काम सुप्रीम कंपनीला देण्यात आले होते , ते काम ठराविक कालावधीत पूर्ण करण्याचे बंधन असतानाही ते काम त्यांनी अर्धवट अवस्थेत सोडल्यामुळे यादरम्यान च्या 7 वर्षाच्या काळात वेगवेगळ्या अपघातांमध्ये अनेक लोकांना जीव गमवावा लागला होता.

तत्कालीन लोकप्रतिनिधींचा या कामाकडील दुर्लक्षपणा लोकांचा जीव घेण्यासाठी कारणीभूत ठरला. जातेगाव ते टेंभुर्णी हा रस्ता राज्य शासनाच्या अखत्यारीत होता.तो राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याने त्यासाठी राज्य शासनाचा ना हरकत दाखला आवश्यक होता. सदर नाहरकत दाखला मिळण्यासाठी आपण सातत्याने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण , उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार ठेवला त्यानुसार रस्ता हस्तांतरणाबाबत बैठक ही लावली अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

जातेगाव ते नगर हा रस्ता यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झालेला होता. तसेच सोलापूर ते पुणे हा रस्ताही राष्ट्रीय महामार्ग कडेच आहे त्यामुळे जातेगाव ते टेंभुर्णी रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार शिंदे हे गेल्या 2 वर्षापासून पाठपुरावा करत होते त्यांना या अधिवेशनात यश आले असून राज्य शासनाने राष्ट्रीय महामार्गाला ना हरकत दिलेली आहे.

जातेगाव टेंभुर्णी प्रमुख राज्य मार्गांचा इतिहास…

2010 साली जातेगाव टेंभुर्णी या रस्त्याचा प्रकल्प शासनाला सादर करण्यात आला. प्रत्यक्षात 2012 साली सार्वजनिक बांधकाम विभाग क्र 2 सोलापूर यांनी सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड यांना 329.98 या किमतीच्या प्रकल्पाचा कार्यारंभ आदेश दिला. जातेगाव टेंभुर्णी या 61 किलोमिटर लांबीच्या रस्त्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक होते. त्यापैकी 12 गावातील 45 मीटर रुंदीकरण करण्यासाठी जमिनीचे भूसंपादन झालेले आहे. त्यासाठी 42.5 इतके अनुदान सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.

एकूण 61 किमी लांबी पैकी 37 किमी लांब भूसंपादन झालेले आहे. उर्वरित 23.27 किमी इतक्या लांबीचे भूसंपादन करणे बाकी आहे. सुप्रीम इन्फ्रा कंपनीने 61 किमी लांबी पैकी 25 कि.मी लांबीचे काम अंशतः पूर्ण केले. त्यानंतर 2015 पासून पूर्णपणे काम बंद ठेवले . जवळपास 7 वर्ष हे काम बंद आहे.मध्यंतरी आमदार संजय शिंदे यांच्या पुढाकारातून सुप्रीम कंपनीकडून काम काढून कल्याणी कंपनीला देण्यात आले होते. परंतु सुप्रीम कंपनी कोर्टात गेल्यामुळे सदर काम होऊ शकले नव्हते.