क्रांतीज्योतींच्या भीडेवाड्याचा मेकओव्हर हवाच! सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

मुंबई : महाराष्ट्राच्या मातीतून अख्ख्या जगाला स्त्री शिक्षणासाठी प्रेरीत करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भीडेवाड्याचा मेकओव्हर झालाच पाहिजे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. विधान सभेत या विषयावर अर्धातास चर्चेच्या निमित्ताने आ. मुनगंटीवार यांनी पोटतिडकीने या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधले.

अवघ्या महाराष्ट्रातील माता-भगिनींचा आदर्श असलेल्या आणि त्यांना शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी प्रसंगी रक्ताचे पाणी करणाऱ्या क्रांतीज्योतींचा पुण्यातील भीडेवाडा न्यायालयीन लढ्यात खितपत पडावा व शासनाने त्यासाठी काहीही करू नये, यापेक्षा दुसरी दु:खी बाब कोणतीही नाही, याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.

भीडेवाड्याचा मुद्दा निकाली काढण्यासाठी प्रसंगी विशेष अध्यादेश काढण्यात यावा. सरकारने सत्तापक्ष, विरोधीपक्ष हा भेद बाजुला ठेवत हा मुद्दा तातडीने निकाली काढावा. भीडेवाड्याच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक स्मारक उभे रहावे, ज्या माध्यमातून संपूर्ण जगाला स्त्री शिक्षणासाठी प्रेरणा मिळत राहिल, अशी मागणीही त्यांनी केली.