शरद पवारांचा ढोंगीपणा उघडा झाला, तरीही मी त्यांचा आदर करतो : विवेक अग्निहोत्री

मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (vivek Agnihotri) यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files)या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, एका बाजूला ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमावरून काही वाद देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या सिनेमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

त्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शरद पवारांच्या वक्तव्याला उत्तर दिले आहे. विवेक अग्निहोत्री म्हणाले की, मी काही दिवसांपूर्वीच एका फ्लाइटमध्ये शरद पवार आणि त्यांच्या पत्नीला भेटलो, त्यांच्या चरणांना स्पर्श केला. या दोघांनी माझे आणि पल्लवी जोशी यांचे चित्रपटाबद्दल अभिनंदन केले आणि आशीर्वाद दिले. मीडियासमोर त्यांना काय झालं माहीत नाही. त्यांचा ढोंगीपणा उघड झाला असला तरीही मी त्यांचा आदर करतो, अशा आशयाचे ट्विट विवेक अग्निहोत्री यांनी केलेले आहे.