वातावरण तापलं! चंद्रकांत पाटील यांना सोशल मीडिया पोस्टमधून धमकी, ३ जणांवर गुन्हा दाखल

पुणे- भाजपा नेते व राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरील शाईफेक प्रकरण गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुण्याच्या पिंपरी परिसरात त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच याप्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे.

महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पुण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या रिल्स ऍपवर चंद्रकांत पाटील यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्यांना धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंद्रकांत पाटील यांच्या प्रकरणात आता तिघांवर गुन्हा दाखल झाल्याने नवी खळबळ उडाली आहे.