राज ठाकरेंची माफी मागा अथवा तुमची सभाच उधळून लावू, मनसे नेत्याचा सुषमा अंधारेंना इशारा

उस्मानाबाद: मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना महागात पडू शकते. उद्या उस्मानाबाद येथे सुषमा अंधारेंची जाहीर सभा आहे. या सभेपूर्वी राज ठाकरेंची माफी मागा अथवा तुमची सभाच उधळून लावू, असा इशारा मनसेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गपाटे यांनी दिला आहे. त्यामुळे आता सुषमा अंधारे राज ठाकरेंची माफी मागतात का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुलुंड येथे झालेल्या एका सभेत ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे. ऊठ दुपारी अन् घे सुपारी असाच कार्यक्रम करतो, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली होती. तसेच अंगावर केस नसली तरी काही फरक पडत नाही. फक्त वाया गेलेली केस असू नये, असा हल्लाही त्यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता चढवला होता.

यानंतर मनसे नेते आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या सुषमा अंधारे यांनी आधी माफी मागावी. अन्यथा त्यांची महाप्रबोधन यात्रा (Mahaprabodhan Yatra) आणि त्यातली सभा उधळून लावू, असे मनसे नेते राजेंद्र गपाटे यांनी म्हटले आहे.TV9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.