अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल – बावनकुळे

मुंबई : चांद्रयान मोहीमेबद्दल (Chandrayaan Mission) आनंद साजरा होत असताना उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पोटदुखी होत असून कांद्याच्या प्रश्नी देवेंद्रजींनी जापानमधून लक्ष घातल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आलं असल्याची टीका भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्टिटवरुन काय म्हटलंय पाहुयात

ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे आज चांद्रयान मोहीमेवरून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्यावर टीका करत आहेत. करोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात. त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही.

संपूर्ण जगात चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल भारताचे कौतुक होत असताना आणि या यशाचा संपूर्ण भारतीय आनंद साजरा करीत असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अर्थात या दोघांचा हा त्रास काही नवीन नाही. दीड वर्षांपूर्वी एकनाथ जी शिंदे यांनी या दोघांच्याही पोटदुखीवर जालीम औषध दिलं होतं पण तरीही दोघांचा पोटदुखीचा आजार काही कमी झाला नाही.

कांद्याच्या प्रश्नी देवेंद्रजींनी जापानमधून लक्ष घातल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचे अश्रू अद्याप थांबले नाहीत. त्यामुळे आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या वृत्तपत्रातून गरळ ओकली.

उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटलेले आहे. सध्या त्यांनी त्याची चिंता करावी. देशाची चिंता करण्यासाठी मा. मोदीजी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्रजी सक्षम आहे. अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल.असं बावनकुळे यांनी म्हटले आहे.