आमच्या भूमिकेचे समर्थन राज्यभरातून सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे – शिंदे

नवी दिल्ली- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. महाविकास आघाडीमधील ५० आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या (Shivsena) बारा खासदारांनी आज लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिले आहे. शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचे पत्र दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते.

मी आमची भूमिका वारंवार सांगितली आहे. आमच्या भूमिकेचे समर्थन राज्यभरातून सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेच आहे. पण महाराष्ट्रातील जनतेनेही त्याचे समर्थन मोठ्या प्रमाणावर केले आहे. निवडणूकपूर्व आमची युती होती. महिन्याभरात आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. जे अडीच वर्षापूर्वी व्हायला हवे होते, ते आता केले आहे.

लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. आम्ही सरकार स्थापन केल्यावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. इंधनापासून शेतीपर्यंतचे अनेक निर्णय घेतले. प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याचे कामही सुरू केले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.