प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन

मुंबई – सुप्रसिद्ध कथक सम्राट, नृत्य गुरु पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचं काल रात्री नवी दिल्ली इथं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली.

लखनौ घराण्याचे पंडित बिरजू महाराज यांचं मूळ नाव ब्रिजमोहन मिश्रा; त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 मध्ये लखनौ इथं झाला. आपले वडील अच्छन महाराज यांच्याकडून त्यांनी कथकचे धडे घेतले. लय तालाची नैसर्गिक देणगी लाभलेले पंडित बिरजू महाराज हे शास्त्रीय संगीत आणि पखवाज वादनातही निपुण होते.

आपल्या कालाश्रम या संस्थेच्या माध्यमातून अनेक कथक कलाकार घडवण्याचं कार्य त्यांनी केलं. राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. शतरंज के खिलाडी, देवदास, उमराव जान, बाजीराव मस्तानी यासारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी नृत्य दिग्दर्शनही केलं आहे.