शिंदे – फडणवीस सरकारचा ‘तो’ निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा – चंद्रशेखर बावनकुळे 

मुंबई – अति उच्चदाब पारेषण वीज वाहिन्यांच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित धोरणास बुधवारी मान्यता दिल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयाबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, वीज वाहिनी व मनोरे उभारण्याच्या सध्याच्या धोरणात बाधित शेतकरी आणि जमीन मालकांना मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने त्यांचा विरोध होत होता. नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांना व जमीन मालकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे मनोरा आणि वाहिनी उभारणी वेगाने होऊन वीज पुरवठ्यास मदत होईल.

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या लोककल्याणकारी योजनांमुळे राज्यातील सामान्य लोकांना थेट लाभ झाला आहे. तथापि, महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षांत या योजनांच्या अंमलबजावणीत राज्यात अडथळे येत होते. त्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत फ्लॅगशिप योजनांना अधिक गती देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुधवारचा आदेश स्वागतार्ह आहे. यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक, प्रधानमंत्री आवास शहरी योजना, प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री किसान सन्मान, स्वामीत्व- ड्रोनद्वारे गावांचे सर्वेक्षण, मृद आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड), किसान क्रेडिट कार्ड, अटल पेन्शन योजना, स्वनिधी योजना त्याचप्रमाणे आयुष्मान भारत जनआरोग्य योजना यासह विविध योजनांच्या राज्यातील अंमलबजावणीला गती मिळेल, असा विश्वास वाटतो.

माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय आजचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्याच्या विविध विभागातील जनतेला दिलासा देणारा आहे, असेही ते म्हणाले.