‘अनेकांनी घराणेशाहीवरुन अर्जुनची खिल्ली उडवली, पण त्याने…’, पंजाब किंग्जच्या संघमालकिनीने अर्जुनची केली पाठराखण

हैदराबाद- इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) हंगामातील 26 वा साखळी सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने 14 धावांनी विजय मिळवत या मोसमातील सलग तिसरा विजय मिळवला. मुंबईकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरसाठीही (Arjun Tendulkar) हा सामना संस्मरणीय ठरला, ज्यामध्ये त्याला आयपीएलची पहिली विकेट मिळाली.

सनरायझर्स हैदराबादच्या डावातील शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी अर्जुन तेंडुलकरकडे देण्यात आली होती, ज्यामध्ये विजयासाठी 20 धावांची गरज होती. या षटकात अवघ्या 5 धावा देऊन अर्जुनला भुवनेश्वर कुमारच्या रूपाने पहिली विकेट मिळाली. यानंतर पंजाब किंग्ज संघाची सह-संघमालकीण प्रीती झिंटाने (Preity Zinta) सोशल मीडियावर अर्जुनचे अभिनंदन केले आहे.

प्रीती झिंटाने अर्जुनबद्दल केलेले ट्विट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे. प्रीतीने लिहिले आहे की, ‘अनेकांनी घराणेशाहीवरुन अर्जुनची खिल्ली उडवली, पण आज त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना उत्तर दिले आहे आणि त्याला त्याची जागा कशी मिळाली? हे सर्वांना दाखवून दिले. यासाठी अर्जुनचे अभिनंदन. सचिन, तुला याचा अभिमान वाटलाच पाहिजे.’

दरम्यान 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल हंगामात अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स संघाचा भाग बनवण्यात आले होते. यानंतर दोन हंगाम बेंचवर बसल्यानंतर अर्जुनला आयपीएलच्या या मोसमात पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याने पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला. अर्जुनने पहिल्या सामन्यात 2 षटकात 17 धावा दिल्या होत्या, तर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 2.5 षटकात 18 धावा देत 1 बळी घेतला होता.