लोकं मला खासदार म्हणतात, त्यामुळे मी सुद्धा खुश होतो – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद – सर्वपक्षांनी मिळून मला राज्यसभेवर निवडून द्यावं, असे आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी  केले होते. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरु होती. शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी ऑफर दिली होती. मात्र, संभाजीराजे यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेने मंगळवारी आपला उमेदवार जाहीर केला. त्यांच्याकडून कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्याने मराठा संघटना आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पुढील काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांच्या घरावर चाल करुन जाणार असल्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे सुद्धा नाव उमेदवार म्हणून चर्चेत होते. आता पवार यांना उमेदवारी घोषित झाल्यावर खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी जरी आज खासदार नसलो तरीही मी खासदारपेक्षा अधिक काम करतो. माझ्यासमोर हे कुणीही काम करत नाही. अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. लोकं मला खासदार म्हणतात त्यामुळे मी सुद्धा खुश होतो की, लोकं मला खासदार समजतात.तर पुढच्या लोकसभेच्या उमेदवारीच काही वचन मिळाले का ? असं विचारताच हे इथं सांगायचं नसतं असे खैरे म्हणाले.