देशासाठी त्याग व बलिदान केलेल्या गांधी कुटुंबाचा मोदी सरकारकडून छळ : नाना पटोले

मुंबई – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने (Narendra Modi Govt) विरोधकांना संपवण्याचे राजकारण सुरु केले असून केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दडपशाही केली जात आहे. काँग्रेस पक्ष, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी (Sonia Gandhi, Rahul Gandhi) हे सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे षडयंत्र आहे. गांधी कुटुंबाने या देशासाठी त्याग केला आहे व बलिदान दिले आहे, त्या गांधी कुटुंबाचा मोदी सरकारकडून चौकशीच्या नावाखाली छळ केला जात आहे त्याविरोधात काँग्रेस आवाज उठवत राहील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काल म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दुसऱ्यांदा ईडीकडून (ED) चौकशी केली जात असल्याने केंद्र सरकारच्या या सुडबुद्धीच्या कारवाईविरोधात मुंबईत मंत्रालयामोर सत्याग्रह करण्यात आला, त्यावेळी नाना पटोले बोलत होते. यावेळी नाना पटोले यांच्यासह, विधिमंडळ काँग्रेस नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजितसिंह सप्रा, आ. राजेश राठोड, मा. आ. मधू चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान, उपाध्यक्ष भाई नगराळे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, डॉ. राजू वाघमारे, जो. जो. थॉमस, राजन भोसले, व्हिजेएनटीचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, निजामुद्दीन राईन, भरतसिंह, झिशान अहमद यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स (ED, CBI, Income Tax) सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा सरकारच्या गुलाम बनल्या आहेत. सरकारच्या इशाऱ्यावर या संस्था विरोधकांवर कारवाई करत आहेत. परंतु काँग्रेस अशा कारवायांना घाबरत नाही. महागाई, जीएसटी, अग्निपथ सारख्या सरकारच्या चुकीच्या धोरणांवर काँग्रेस पक्ष सरकारला जाब विचारत आहे. सरकारकडे या प्रश्नावर उत्तर नाही म्हणून विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी चौकशीचा फार्स केला जात आहे. नॅशनल हेराल्ड वर्तमान पत्राने स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे, त्याच वर्तमान पत्राच्या खोट्या प्रकरणात सोनियाजी व राहुलजी यांची चौकशी केली जात आहे म्हणून राज्यभर जिल्हा, तालुका प्रदेश पातळीवर काँग्रेसचा सत्याग्रह करून केंद्र सरकारचा निषेध केला आहे.

यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की, सोनियाजी गांधी त्याग आणि संघर्षाच्या प्रतिमूर्ती आहेत. त्या देशातील गोरगरीब, सर्वसामान्य पीडित शोषीत वंचितांचा आवाज आहेत. केंद्र सरकारच्या या दडपशाहीला त्या भीक घालत नाहीत. आमच्यासारखे कोट्यवधी कार्यकर्ते त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले की, काँग्रेस पक्ष महागाई, बेरोजगारी सारखे सामान्य माणसांचे प्रश्न हाताळत आहे. संसदेत व संसदेबाहेर काँग्रेस पक्ष भाजपा सरकारला जाब विचारत आहे त्यामुळे ईडीसारख्या कारवायांच्या माध्यमातून दबाव आणून विरोधकांना संपवण्याचे काम केले जात आहे. लोकशाहीत विरोधकांना असा त्रास देण्याचे काम लोकशाहीला मारक आहे. सरकारविरोधात आवाज उठवणे हा लोकशाही परंपरेचा भाग आहे पण भाजपा सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम करत आहे.