धायरी परिसरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, नागरिक भीतीच्या छायेखाली, झोपेचेही झाले वांदे 

पुणे : धायरी आणि डीएसके विश्व परिसरातील (Dhairi and DSK Vishwa Campus) नागरिकांना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असून, सकाळी फिरायला जाणाऱ्या, घराबाहेर, सोसायटी खेळणाऱ्या मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर असलेल्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांपासून मोठा धोका निर्माण झाला आहे.

परिसरामध्ये गेल्या काही दिवसांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फिरायला जाणारे, रात्री उशिरा दुचाकीवर असलेल्या नागरिकांवर तर ही भटकी कुत्री (stray dog) हल्ले करतातच; पण गेल्या काही दिवसांपासून टोळीने राहणारे ही भटकी कुत्री प्रचंड विचित्र आवाजामध्ये रात्रीच्या वेळी विव्हळतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत. काही नागरिकांवर या कुत्र्यांनी हल्ला देखील केल्याच्या घटना घडल्या असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

शहराचा वाढता विस्तार, रस्त्यावर टाकाला जाणार कचरा, या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करून त्यांना खाऊ घालणारे नागरिक यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेच्या वतीने सन २००७ मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात आली. त्या वेळी संपूर्ण पुणे शहरामध्ये ४० हजार भटकी कुत्री असल्याचे स्पष्ट झाले होते. आता ही संख्या लाखांच्या पुढे गेली असण्याची शक्यता आहे.

शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियमितपणे या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते; परंतु भटक्या कुत्र्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता, या उपाय-योजना खूपच अपूर्ण पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. धायरी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, गेल्या काही दिवसांत या भटक्या कुत्र्यांमुळे या भागातील नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.  पुण्यात दरवर्षी १५ हजार नागरिकांना कुत्री चावल्याच्या घटना घडतात. सुदैवाने रेबीज या महाभयंकर रोगाने अजूनतरी डोके वर काढलेले नसले तरी, कुत्रे चावण्याच्या या मोठ्या प्रमाणाकडे पाहता भविष्यात या रोगाचे रुग्ण दिसू शकतील, अशी भीती व्यक्त होते आहे.