पंतप्रधानांकडून पीएम-किसानचा दहावा हप्ता जारी; शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे झाले जमा 

नवी दिल्ली-  तळागळातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या संकल्पाने आणि सातत्यपूर्ण बांधिलकीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(पीएम- किसान) योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा दहावा हप्ता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जारी केला. यामुळे सुमारे 10 कोटींपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या खात्यात 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. यावेळी पंतप्रधानांनी 351 एफपीओ अर्थात कृषी उत्पादक संघटनांना 14 कोटी रुपयांहून अधिक रक्कमही हस्तांतरित केली. यामुळे 1.24 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी काही कृषी उत्पादक संघटनांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, कृषीमंत्री आणि विविध राज्यांमधील शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उत्तराखंडच्या कृषी उत्पादक संस्थेशी संवाद साधताना पंतप्रधानांनी त्यांनी निवडलेल्या सेंद्रीय शेतीच्या पर्यायाबाबत आणि सेंद्रीय उत्पादनांना प्रमाणीकरण करण्याच्या मार्गांबाबत विचारणा केली. एफपीओंच्या सेंद्रीय उत्पादनांच्य विक्री व्यवस्थेबाबतही त्यांनी चर्चा केली. या शेतीसाठी सेंद्रीय खतांची व्यवस्था कशा प्रकारे केली जाते याची माहिती या कृषी उत्पादक संस्थानी पंतप्रधानांना दिली. सरकारच्या प्रयत्नांमुळेच नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या शेतीमुळे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होत आहे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारण होत आहे, असे ते म्हणाले.

पंजाबमधील शेतकरी उत्पादक संघटनांनी पंतप्रधानांना शेतातील उर्वरित कचरा (पराली) न जाळता त्याची विल्हेवाट लावण्याच्या पद्धतींची माहिती दिली. सुपरसीडर आणि सरकारी संस्थांकडून मदतीबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले. उर्वरित कचर्याच्या व्यवस्थापनातील त्यांच्या अनुभवाचे अन्य ठिकाणी देखील अनुकरण व्हावे, अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली. राजस्थानमधील शेतकरी उत्पादक संघटनांनी त्यांच्या मध उत्पादनाबद्दल सांगितले. नाफेडच्या मदतीमुळे कृषी उत्पादक संस्था ही संकल्पना त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या समृद्धीचा पाया म्हणून शेतकरी उत्पादक संघटना निर्माण केल्याबद्दल उत्तर प्रदेशातील शेतकरी उत्पादक संघटनांनी पंतप्रधानांचे आभार मानले. सभासदांना बियाणे, सेंद्रिय खते, विविध प्रकारची फलोत्पादन उत्पादने यासाठी मदत प्रक्रियेबद्दल त्यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करण्याबाबतही त्यांनी सांगितले. त्यांना ई-नाम सुविधांचा लाभ मिळत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. देशातील शेतकऱ्याचा आत्मविश्वास ही देशाची प्रमुख ताकद असल्याचे पंतप्रधान म्हणाले.