रविवारी पहाटे पुण्यातील ‘या’ भागातील राहणार वीज बंद

पुणे : महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर ( Maharadeshan Company’s Kharadi to Theur ) या १३२ केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाईनचे तातडीचे दुरुस्ती काम करणे अत्यावश्यक असल्याने नगररोड, विमाननगर (Vimannagar), कल्याणीनगर, येरवडा (Yerawada) या परिसरामध्ये रविवारी (ता. ८) पहाटे चार ते सहा वाजेदरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे. उन्हाच्या झळा तसेच दैनंदिन कामांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पहाटेच्या सुमारास महापारेषणकडून दोन तासात हे दुरुस्ती काम पूर्ण करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या थेऊर ते खराडी तसेच लोणीकंद ते खराडी या टॉवर लाईनचे जम्प बदलण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम तातडीचे व अत्यावश्यक असल्याने पूर्वनियोजन करून रविवारी (ता. ८) पहाटे दोन तासांत ते पूर्ण करण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे खराडी अतिउच्च दाब उपकेंद्रातून होणाऱ्या महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या १९ वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडून १९ पैकी ११ वाहिन्यांचा वीजपुरवठा महापारेषणच्या मगरपट्टा, थेऊर, व्हीएसएनएल या अतिउच्च दाब उपकेंद्राद्वारे पर्यायी स्वरुपात सुरु ठेवण्यात येणार आहे. तथापि विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्यास काही वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पहाटे दोन तास नाईलाजाने बंद ठेवावा लागणार आहे. या परिसरातील संबंधित वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर याबाबत ‘एसएमएस’द्वारे माहिती देण्यात येत आहे.

रविवारी (ता. ८) पहाटे ४ ते ६ वाजेदरम्यान गांधीनगर, यशवंतनगर, गणेशनगर, जयप्रकाशनगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा गाव, रामनगर, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी, पीडब्लूडी वसाहत, त्रिदलनगर, नागपूर चाळ, सह्याद्री हॉस्पीटल परिसर, विमानगर, रोहन मिथीला सोसायटी, साकोरेनगर, राजीवनगर नॉर्थ व साऊथ, गणपती मंदिर चौक, दत्त मंदिर चौक, श्रीकृष्ण हॉटेल, फिनिक्स चौक, श्रीरामनगर, पारेशरनगर, फॉरेस्ट पार्क, खुळेवाडी, खांदवेनगर, विमानतळ रोड, रामवाडी गावठाण, चंदननगर, संघर्ष चौक, प्रितनगर, अष्टविनायक नगर, पद्मय्या सोसायटी, बोराटेवस्ती, यशवंतनगर, तुकारामनगर, गणपती हाऊसिंग सोसायटी, शेजवळ पार्क, साई पार्क, वृंदावन कॉलनी, म्हाडा कॉलनी या परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून (MSEDCL) करण्यात आले आहे.