‘…हा तर महाराजांचा अपमान; सुप्रिया सुळे… जनाची नाही तर मनाची तरी लाज धरा’

पुणे – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यंत ED कोठडी सुनावली आहे. काल आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध केला.

दरम्यान, काल खा. सुप्रिया सुळेंनी नवाब मलिक यांच्या अटकेवर आश्चर्य व्यक्त करतानाच आम्ही छत्रपतींचे मावळे असून कुणासमोरही झुकणार नसल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी टोकाची भूमिका याआधी कुणी घेतली नव्हती. भाजपातले काही लोक सातत्याने ट्वीट करत होते की १५ दिवसांनी अटक होईल, छापे पडतील. ते खरं झालंय. कारण ईडी आणि भाजपा एकच आहे असा अर्थ आता काढावा लागेल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुळे यांच्या याच विधानाचा धागा पकडून भाजयुमोचे नेते प्रदीप गावडे यांनी सुळे यांना लक्ष्य केले आहे.  ते म्हणाले, मुंबई बॉम्बस्फोट घडवून शेकडो हिंदूंचा जीव घेणाऱ्या दाऊदला फंडिंग करणाऱ्या नवाब मलिकचे समर्थन करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेणे हा महाराजांचा अपमान आहे, सुप्रिया सुळे जनाची नाही तर मनाची तरी लाज धरा. अशी जहरी टीका गावडे यांनी केली आहे.