‘नवाब मलिकांनी अनेक बांगलादेशी तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलले’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यानंतर या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मिळून धरणे आंदोलन करण्यात येत असून, सत्तेतील तीन पक्षांची एकजूट दाखवण्यात येत आहे.

अशातच भाजप नेते मोहित कंबोज यांनी मलिकांवर धक्कादायक आरोप केले आहेत. मोहित कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी बांगलादेशातून मुली आणून वेशाव्यवसाय केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. तसेच या मुलींचे स्टिंग ऑपरेशन आम्ही केले असून आमच्याकडे त्याचे व्हिडीओ पुरावे देखील आहेत ज्यामध्ये मुलींनी ही गोष्ट कबुल केलं असल्याचं देखील मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. मलिकांच्या अटकेमुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार वाद जोरदार पेटला आहे. तसेच त्यामुळे मविआचे नेते देखील आक्रमक झाले आहेत.