“नवरात्रोत्सवात पटोलेंनी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी केलेला ‘तो’ एक जोक असावा”

Nana Patole on Lumpy Virus : गायवर्गीय पशूंना ‘लम्पी स्किन डिसीज’ (Lumpy skin disease) या साथीच्या रोगाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या आजाराची साथ परसली आहे. तसेच, यावरती उपाय रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे रोगाचा संसर्ग होण्याचा वेग कमी आला आहे. त्यात आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी लम्पी रोगाबाबत अजबच दावा केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले,” असे नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, पटोलेंच्या या वक्तव्यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले यांचे विधान हास्यास्पद आहे. अशा पद्धतीने काँग्रेसचे नेते वक्तव्य करत असतील, तर जनतेने याची नोंद घ्यावी. खरं तर लम्पी हा आजार चित्ते भारतात येण्यापूर्वी आला आहे. त्यामुळे हा आजार चित्त्यांमुळे आला, असं म्हणणं म्हणजे काँग्रेस कशा पद्धतीने जनतेत भ्रम निर्माण करते, याचं उत्तम उदाहरण आहे”, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच “नवरात्रोत्सवात पटोलेंनी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी केलेला जोक असावा”, असा टोलाही त्यांनी नाना पटोले यांना लगावला आहे.