सांभाळून बोला, हा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला तर मानेल; आंबेडकरांचा राऊतांना टोला

मुंबई- काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांमध्ये युती झाली. या युतीनंतर राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा शिवसेना पक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमवेत महाविकास आघाडीचा घटक आहे. त्यामुळे या युतीवरुन महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल खळबळजनक (Prakash Ambedkar On Sharad Pawar) विधान केले आहे.

शरद पवार हे आजही भाजपासोबत आहे, प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्याने राज्यात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. तसेच आमचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. आमची युती ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी आहे, असेही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

शरद पवारांबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्ताचा दाखला दिला. ते म्हणाले की, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर मुलाखत दिली होती. तेव्हा अजित पवार म्हणाले होते की, मला लोक दोष का देतात? हे तर आमच्या पक्षाचे ठरले होते. मी फक्त सर्वात आधी गेलो. हे लोकसभे आधीच आमचे ठरले होते. हा दाखला देत प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, आता या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. यावर आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. महाविकासआघाडी सामील व्हायचं असेल तर या आघाडीतले प्रमुख स्तंभ आणि नेते आहेत त्यांच्याविषयी आदर ठेवून तसेच सांभाळून बोललं पाहिजे, असा इशारा राऊतांनी आंबेडकरांना दिला आहे.

भाजपच्या यंत्रणेनं सर्वाधिक हल्ले शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर केले आहेत. शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची युती झाली आहे. व आंबेडकर भविष्यात महाविकासआघाडीचे घटक होतील, अशी आमची आशा आहे. याची प्रक्रिया सुरू असेल तर या आघाडीतले प्रमुख स्तंभ आणि नेते आहेत त्यांच्याविषयी सर्वांनी आदर ठेवून बोललं पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवारांसोबत मतभेद असू शकतात, हे मतभेद आम्ही एकत्र बसून दूर करू, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, आता प्रकाश आंबेडकर यांनीही संजय राऊत यांना टोला लगावला आहे. सांभाळून बोला हा सल्ला शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला असता तर मानला असता, असा टोला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) लगावला आहे. आमची युती शिवसेनेशी झाली असल्याचा पुनरुच्चार आज प्रकाश आंबेडकरांनी केला. दरम्यान, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोणताही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रू नाहीत. पण वंचित बहुजन आघाडी एमआयएम बरोबर युती करणार नसल्याचे आंबेडकरांनी सांगितले.