घरजावयाला घरात राहू नको, असं सांगणं पडलं महागात; जावयाने सासू सोबत केले ‘हे’ भयंकर कृत्य 

पुणे – घरजावयाला घरात राहू नको, असं सांगणं एका सासूबाईंना चांगलेच महागात पडले आहे. जावयानं सासूच्या अंगावर गरम पाणी ओतून तिला जबर मारहाण केली. त्यानंतर सासूचं डोकं फरशीवर आपटलं. या सगळ्या मारहाणीत सासूचे दातही पडले. ही घटना पुण्यातील खडकी परिसरात घडली.

एबीपीच्या वृत्तानुसार, मागील अनेक वर्षांपासून सुजाता शिंदे, त्यांची मुलगी आणि जावई तिघेही खडकी परिसरात राहत होते. सासू, मुलगी आणि जावई एकाच घरात राहत असल्यानं घरात सतत काहीना काही कुरबुरी सुरू असायच्या. मात्र अनेकदा सासूनं या सगळ्याकडे लक्ष दिलं नाही. त्यातच वाद वाढत गेले आणि सासूनं थेट जावयाला घराबाहेर निघून जाण्यास सांगितलं. याचा जावयाला राग आला आणि त्यानं थेट गरम पाणी सासूवर ओतलं आणि मारहाण केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू सुजाता शिंदे यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी जावई महेंद्र सिद्धनाथ तोरणे याला अटक केली आहे. मारहाणीत सासू जखमी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.