देशातील प्रमुख स्थानकांवर रेल्वे ईव्ही चार्जिंग पॉइंट उभारणार, यादीत ‘या’ शहरांचा समावेश

Pune – पुढील तीन वर्षांत रेल्वे देशातील प्रमुख स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन (Electric vehicle charging station) तयार करणार आहे. यासाठी रेल्वे स्वतंत्र धोरण तयार करत आहे, ज्यामुळे ई-मोबिलिटीला चालना मिळेल. इकॉनॉमिक टाइम्सने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या पाहता रेल्वे हे मोठे पाऊल उचलणार आहे. सध्या लोक ईव्ही कार खरेदी करणे टाळत आहेत. कारण त्यांना चार्जिंग स्टेशनच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. या दिशेने पूर्वीपेक्षा जास्त काम झाले असले तरी अजून बरेच काही करायचे आहे. रेल्वेही यामध्ये आपली भूमिका बजावणार असून त्यासाठी स्वतंत्र ईव्ही पॉलिसी आणली जात आहे.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या पहिल्या टप्प्यात, मेगा-शहरांच्या श्रेणीत मोडणारी आणि 40 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश केला जाईल. रेल्वेच्या दस्तऐवजानुसार, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, पुणे आणि सुरत येथे ईव्ही चार्जिंग स्टेशन बनवण्याचे काम सुरू केले जाईल. चार्जिंग स्टेशन बनवण्याचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

रस्त्यावरून पेट्रोल आणि डिझेलची वाहने कमी करता यावीत यासाठी सरकारकडून ईव्ही वाहनांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. पेट्रोल आणि डिझेलची वाढती महागाई आणि अशा इंधनाच्या आयातीवर होणारा प्रचंड खर्च याला तोंड देण्यासाठी सरकार ईव्हीवर भर देत आहे. यासाठी एकीकडे सरकार ईव्ही वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीला प्रोत्साहन देत आहे, तर दुसरीकडे चार्जिंग स्टेशन उभारून लोकांना चार्जिंगच्या समस्येपासून दिलासा दिला जात आहे.

रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यात ज्या शहरांमध्ये आणि स्थानकांची लोकसंख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन बांधले जातील. चार्जिंग स्टेशन बांधण्याचा दुसरा टप्पा डिसेंबर 2025 मध्ये सुरू होईल. यामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांची आणि मेगा सिटींची निवड केली जाईल. यासोबतच देशातील इतर शहरांचाही यात समावेश होणार आहे. डिसेंबर 2026 पर्यंत, रेल्वे देशातील अनेक स्थानकांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापित करेल. यासाठी विभागीय रेल्वे स्थानकांना अहवाल तयार करून शेअर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

स्थानकांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी दोन प्रकारच्या नियोजनावर काम केले जात आहे. प्रथम, ज्या झोनल रेल्वे अंतर्गत स्टेशन येईल, त्या झोनला ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी बजेट दिले जाईल. चार्जिंग स्टेशन बनवण्याचे काम सर्वस्वी परिमंडळ विभागाची असेल. दुस-या नियोजनात, स्टेशन्सवर डेव्हलपर मोडमध्ये चार्जिंग स्टेशन बांधले जातील. यासाठी चार्ज पॉईंट ऑपरेटर निवडले जातील जे रेल्वेला परवाना भाडे देतील आणि त्यांच्यानुसार चार्जिंग स्टेशन बांधून त्यातून कमाई करतील.