पु्ण्यातील घटनेवरुन राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले, “माझ्या महाराष्ट्र सैनिकांना…”

पुण्यात आज दर्शना पवार हत्या प्रकरणाची (Darshana Pawar Murder Case) पुनरावृत्ती होता होता राहिली. कॉेलज तरुणीवर एमपीएससी करणाऱ्या तिच्या मित्राने सदाशिव पेठेत कोयत्याने (MPSC Girl Attacked) हल्ला केला.

या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर ही तरुणी जीव मुठीत धरून धावायला लागली. मात्र तिच्या मागे कोयता घेऊन धावणार्‍या तरूणाला पाहुन कोणीच मदतीला पुढ आलं नाही. जखमी अवस्थेत ती मुलगी धावत होती. एवढ्यात लेशपाल जवळगे (Leshpal Javalge) नावाच्या तरुण त्या मुलीच्या मदतीला धावला. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार एवढ्यात लेशपाल जवळगेने कोयता पकडला आणि हल्लेखोर तरुणाला रोखले. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. त्यानंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलय.

आता या घडलेल्या प्रकारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं.

दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा, असे आवाहनही राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ट्वीटद्वारे केले आहे.