‘आरती आणि इफ्तार पार्टी ही किमया सर्वधर्मसमभाव या तत्त्वांवर निष्ठा ठेवणारी राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते’

मुंबई  – पुण्यातील हनुमान मंदिरात आरती आणि मुस्लिम समाजातील बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन ही किमया फक्त सर्वधर्मसमभाव या तत्त्वांवर निष्ठा ठेवणारी राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते ती भाजप करू शकत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात व देशामध्ये सांप्रदायिकतेचा नाग पुनश्च एकदा आपला फणा काढून असताना महाराष्ट्राच्या जनतेने सर्वधर्मसमभाव या तत्त्वावर निष्ठा ठेवून या विषारी धर्मवादी नागाचा फणा ठेचावा असे आवाहन महेश तपासे यांनी जनतेला केले आहे.

काही लोक राज्यातील शांती बिघडवण्याचा व राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना त्यांच्या मनसुब्यामध्ये यशस्वी होऊ न देणे हे कर्तव्य नागरिकांनी पार पाडले पाहिजे असेही महेश तपासे म्हणाले.

महाराष्ट्र सदैव शाहू-फुले-आंबेडकर आणि पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवून प्रगती करणारे राज्य आहे. २०१९मध्ये महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर सातत्याने सरकार बदनाम करणे, सरकार पाडणे याचे मुहूर्त काढले गेले व राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्नदेखील करण्यात आले परंतु हे सर्व कुटील डाव महाविकास आघाडीने परतवून लावले आणि पुनश्च एकदा महाराष्ट्र विकासाच्या मार्गाने मार्गक्रमण करू लागला आहे.

आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने नागरिकांनी भाजपरुपी रावणाची जातीयवादी व धर्मवादी लंका दहन करण्यासाठी प्रतिज्ञा केली पाहिजे. महाराष्ट्र हे सामाजिक सलोख्याचा राज्य आहे आणि देशाला सर्वधर्मसमभाव या विचाराचा मंत्र भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.