वारकऱ्यांसाठी विमा योजना हा भागवत धर्माच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न 

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची प्रतिक्रिया 

पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पंढरीच्या वारकऱ्यांसाठी विमा छत्र योजना जाहीर करून भागवत धर्माच्या समाजावरील ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयाबद्दल  भारतीय जनता पार्टी शिंदे- फडणवीस सरकारचे अभिनंदन करत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांसाठी, “विठ्ठल- रूक्मिणी वारकरी विमा छत्र योजना” सुरू करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. या योजनेत यात्रेच्या तीस दिवसाच्या काळात राज्य शासनाकडून वारकऱ्यांचा विमा उतरवला जाणार आहे. यात्रेच्या काळात वारकरी आणि त्यांच्या कुटुंबियांचा अपघात झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी ३५ हजारांचे अर्थसाह्य , कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रु. अर्थसहाय्य केले जाणार आहे. वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला शासनाकडून ५ लाख रूपये अर्थसहाय्य केले जाणार आहे.

पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने ‘माझ्या जीविचि आवडी ‘पंढरपुरा नेइन गुढी ‘ ही ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा वारीच्या रूपाने शेकडो वर्षापासून वारकरी पूर्ण करत आहेत.  येथ भक्ती प्रमाणजाती अप्रमाण’, ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ , या  संतश्रेष्ठ तुकोबांच्या अभंगाप्रमाणे पंढरीची वारी समतेचा संदेश देणारी आहे. केवळ विठुरायाच्या दर्शनासाठी लक्षावधी गोरगरीब वारकरी पंढरीत येत असतात. समाज आणि सरकारकडून कोणतीही अपेक्षा नसलेल्या पंढरीच्या यात्रेकरूंना विमा संरक्षण देऊन राज्य सरकारने आपली भागवत धर्मपोटी असलेली बांधिलकी प्रकट केली आहे, असेही  भांडारी यांनी नमूद केले आहे .

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने वारकरी सांप्रदायातील बंडातात्या कराडकर यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तीमत्त्वाला अटक केली होती. वारकरी सांप्रदायाचा असा अपमान करणारे उध्दव ठाकरेंचे मविआ सरकार आणि वारकऱ्यांसाठी विमा योजना सुरू करणारे शिंदे- फडणवीस सरकार यातून वारकऱ्यांचे खरे कैवारी कोण आहेत हे स्पष्ट होते, असेही भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे.