नवा ट्वीस्ट : अजित पवार होणार राज्याचे मुख्यमंत्री? मोदी सरकारमधील मंत्र्याची खुली ऑफर

मुंबई –  विधानसभेचे विरोधी पक्षनेते गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत येत आहेत. आज ते पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत.  केंद्रात मोदी सरकारमध्ये मंत्री असणारे रामदास आठवले यांनी अजित पवार यांना खुली ऑफर दिली आहे. अजित पवार हे माझ्या पक्षात आल्यावर मला खूप आनंद होईल आणि त्यांना मुख्यमंत्री केले जाईल असं म्हणत आठवलेंनी अजितदादांना खुली ऑफरच देवून टाकली आहे.

अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे असून त्यांना आजवर पक्षात अनेक पदे ज्ञात आली आहेत. अशा परिस्थितीत अजित पवार हे भाजपमध्ये येतील असे वाटत नाही. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे चांगले मित्र असून दोघांनीही एकत्र शपथ घेतली होती. भविष्यात अजित माझ्या पक्षात आल्यास मला आनंद होईल. आमच्या पक्षाला संधी मिळाल्यास अजित पवारांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री करू, असं रामदास आठवले म्हणाले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अजित पवार भाजपसोबत जातील का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार हे काम करीत आहेत. शरद पवार यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदासह अनेक पदे देऊन अनेक वेळा न्याय देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर मध्यंतरी अजित पवार हे आजारी होते. त्यामुळे त्यांचा फोन बंद असल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. पण अजित पवार भाजपसोबत जातील, याबाबत मला काही तथ्य वाटत नाही. मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची चांगली मैत्री असून त्या दोघांनी यापूर्वी एकत्रित शपथ घेतली आहे. पण अजित पवार हे माझ्या पक्षात आल्यावर मला खूप आनंद होईल आणि त्यांना मुख्यमंत्री केले जाईल”, अशी ऑफरच रामदास आठवले यांनी अजित पवार यांना दिली आहे.