धोनीची सीएसके आयपीएलमधून होणार बॅन? तमिळनाडू विधानसभेत गदारोळ; काय आहे प्रकरण?

चेन्नई- एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आयपीएल २०२३ मध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. मात्र लवकरच सीएसके संघाच्या आनंदावर विरजण लागण्याची शक्यता आहे. कारण सीएसके संघावर बंदी घातली (Ban On CSK) जाऊ शकते. परंतु यामागचे कारण काय आहे?, ते सविस्तर जाणून घेऊया.

खरे तर, तामिळनाडू विधानसभेत (Tamilnadu Assembly) सीएसके संघाचा मुद्दा तापला आहे. मंगळवारी (११ एप्रिल) पट्टाली मक्कल काचीच्या (पीएमके) आमदाराने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि सीएसकेवर बंदी घालण्याची मागणी केली. संघात तामिळ खेळाडू नसल्याने सीएसकेवर बंदी घालण्यात यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला.

विधानसभेत खेळावरील अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान, धर्मपुरीचे पीएमके आमदार व्यंकटेश्वरन यांनी सीएसकेवर बंदी घालण्याची मागणी उपस्थित केली. व्यंकटेश्वरन म्हणाले, “तामिळनाडूमध्ये अनेक क्रीडापटू आहेत. तामिळनाडूची राजधानी चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर आहे. तरी देखील संघात एकही तमिळ खेळाडू नसणे हे दुर्दैवी आहे. मी फक्त विधानसभेत हा मुद्दा मांडला आहे. या विषयावर मंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलेले नाहीत. मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री कारवाई करतील, याची मला खात्री आहे. तामिळनाडूत तमिळ लोकांना महत्त्व दिले नाही तर ते इतरत्र कुठेही मिळणार नाही.” असे त्यांचे म्हणणे आहे.