‘…तर सरकारने शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्यावी’

सोलापूर : सरकारने वाईन् व मध्यसदृश्य पदार्थास किराणा दुकाने व माॅल्स इ.ठिकाणी विक्रीसाठी परवानगी दिली आहे.. या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा होईल असं सरकारचं मत आहे मात्र आता याच मुद्द्यावरून ‘शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्यावी’ ही सरकारकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन थेट मागणी करण्यात आलीय.

याबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल म्हणाले, सरकारने वाईन्सच्या खुल्या विक्रीस परवानगी दिली आहे,त्यानुसार आता वाईन्स कुठेही उपलब्ध होतील,यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे भले होईल असा जर सरकारचा दृष्टिकोन असेल तर आता राज्यातील शेतकऱ्यांना ‘गांजा’ उत्पादनाची परवानगी देण्यास काय हरकत आहे,’सरकारने गांजा लागवडीबाबत ही निर्णय घ्यायला हवा’ असे बागल म्हणाले.

एकीकडे राज्यातील शेतकरी रासायनिक खते,बीबियाणे औषधे यांच्या वारेमाप भाववाढीमुळे प्रचंड अडचणीत आहे. पारंपरिक शेतीचे आर्थिक नियोजन ढासळत चालले आहे. तर अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना ‘गांजा लागवड व उत्पादन’ यासाठी सरकारने परवानगी देत प्रोत्साहन दिल्यास कृषीक्षेत्रास देखील उभारी मिळेल म्हणून आम्ही ही मागणी करत आहोत असे बागल म्हणाले.

वाईन्स खुल्या पध्दतीने विक्री होतील आणि शेतकऱ्यांकडून नकळत गांजा लागवड झाल्यास त्याला गुन्हेगार ठरवले जाणार हा दुजाभाव सरकारने करू नये,गांजाचा वापर प्राचीन काळापासून केला जातो तसेच कुंभमेळ्यात देखील सर्रास गांजाचा वापर दिसुन येतो. जर सरकारला एवढाच शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर शेतकऱ्यांना गांजा लागवड व उत्पादन हे क्षेत्र खुलं करावं व या मुद्द्यावर स्वाभिमानीने आवाज उठवावा अशी राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडून राजु शेट्टी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ही मागणी करण्यात आली असुन फक्त ‘स्वाभिमानी’चीच नव्हे तर राज्यभरातील असंख्य शेतकऱ्यांची ही मागणी आहे असेही बागल पुढे बोलताना म्हणाले…