गरज लागेल त्यांना पक्ष भाड्याने मिळतो;  विनायाक राऊत यांनी उडवली मनसेची खिल्ली

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांची औरंगाबाद येथील जाहीर सभा  पार पडली. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मशिदींवरील भोंग्यांबाबत (Loudspeaker) भूमिका घेत राज यांनी मागील दोन सभांमधून आघाडी सरकारवर (MVA) ताशेरे ओढले होते.

राज ठाकरे (Raj Thackaray) यांच्या औरंगाबादेतील सभेकडे केवळ महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे लक्ष लागले होते. तुडुंब भरलेल्या गर्दीसमोर भाषण करतांना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. भाषणातील बहुतांश वेळ  राष्ट्रवादीमुळे सुरू झालेले जातीपातीचे राजकारण यावर प्रहार करतांनाच राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या संदर्भात चार तारखेनंतर ऐकणार नसल्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) सभेत  राज ठाकरे यांनी शिवसेना व उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याबद्दल शब्द देखील काढला नाही.

मात्र, आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी राज ठाकरे यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले, मनसेने आपला पक्ष केवळ भाड्यावर ठेवलेला आहे. जेव्हा कुणाला गरज लागेल तेव्हा भाड्याने देतोय असं सांगितले असल्याने त्यांच्या वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही. कालची सभा आम्ही ऐकली पण नाही आणि पाहिली पण नाही. असे किती आले आणि किती गेले, शिवसेना आणि महाविकास आघाडीचं सरकार भक्कम राहील त्याला कुणाचाही धोका नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले,  महाराष्ट्राचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी केलेले वक्तव्य बोलकं आहे. भोंग्या संदर्भातला प्रश्न हा देशपातळीवर चा प्रश्न असल्याने मनसे प्रमुखांना सांगू इच्छितो की तुम्ही ज्या पक्षाची तळी उचलता त्या पक्षाचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सांगा आणि कायदा करून घ्या मग तुम्हाला रस्त्यावर उतरायची गरज नाही. अशा शब्दांत विनायक राउत यांनी राज यांची खिल्ली उडवली आहे.