अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नावनोंदणी सुरू होणार

नवी दिल्ली- अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नावनोंदणी सुरू होणार आहे. ही यात्रा 30 जूनपासून सुरू होणार असून, ती 11 ऑगस्टपर्यंत चालेल. जम्मू आणि काश्मीर बँक (J&K Bank), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank), येस बँक (Yes Bank)आणि भारतीय स्टेट बँकेच्या (State Bank Of India) विविध शाखांमध्ये भाविक नावनोंदणी करू शकतील, असं श्री अमरनाथजी तीर्थस्थान मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वरकुमार (Nitishwarkumar)यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

विशेष वेबसाइट आणि मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही नावनोंदणी करता येणार आहे. रामबन जिल्ह्यात एक पर्यटक निवास उभारलं जात असून, त्यात छत्तीसशे भाविकांची सोय होऊ शकणार आहे. या वर्षी या यात्रेसाठी तीन लाख भाविक येतील, असा मंडळाचा अंदाज आहे. पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून यात्रा एकाच वेळी सुरू होणार आहे, असं नितीश्वरकुमार यांनी सांगितलं.

प्रत्येक मार्गावर एका दिवशी फक्त दहा हजार भाविकांना मुभा दिली जाणार आहे. भाविकांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी सरकार या वर्षी आरएफआयडी यंत्रणेचा वापर करणार आहे.