आईच्या दुधाशी बेईमानी… उद्धव ठाकरेंचे उरलेल्या 15 आमदारांना पत्र

मुंबई – राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोर आमदार, अपक्ष आमदार आणि भाजपच्या (BJP) मदतीने नवे सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या बंडाच्या भूकंपाचे अजूनही धक्के शिवसेनेला बसत असून अनेक नेते आता शिंदे गटात सामील होत आहेत.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्यावर निष्ठा दाखवत संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल शिवसेनेच्या 15 आमदारांना (ShivSena MLA) धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र पाठवले आहे. पत्रात म्हटलं आहे की, आईच्या दूधाशी बेईमानी करू नका हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचा मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत राहत निष्ठेचे पालन केले आहे. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिलेत. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना असं पत्रात म्हटलं आहे.

पत्रामध्ये म्हटलं आहे, शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती आपल्याला बाळासाहेबांनी शिकवली आहे. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण निष्ठेचं पालन केलंत. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक असल्याचं आपण दाखवून दिलंय, असं पत्रात म्हटलं आहे. आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात. आपल्या भूमिकेमुळं महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळालं आहे, असंही पत्रात म्हटलं आहे.