धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेकण्याचा संकल्प करा: नाना पटोले

Nana Patole: देशाची सत्ता ज्या दिवशी धर्मांध शक्तींच्या हातात जाईल त्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते ते आज स्पष्ट दिसत आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी मोठी लढाई लढावी लागली, बलिदान द्यावे लागले. सत्तेत आज धर्मांध शक्ती आहेत आणि लोकशाही, संविधान, सर्व लोकशाही व्यवस्था पायदळी तुडवली जात आहे. स्वातंत्र, लोकशाही, संविधानाला न माननाऱ्या विचारधारेच्या धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेकण्याचा संकल्प आजच्या प्रजासत्ताक दिनी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टीचे नेते होते, त्यांनी जी भिती व्यक्त केली होती ती आज खरी ठरत आहे. देशात आज जाती-धर्माच्या नावाने भांडणे लावली जात आहेत. विविध भाषा, जाती, धर्म, संस्कृतीचे लोक या देशात गुण्यागोविंदाने रहात असताना देश तोडण्याचे काम केले जात आहे. ओबीसी, आदिवासी, एससी, एसटी यांचे अधिकार कमी केले जात आहेत. गांधी-नेहरुंचा विचार संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत. पुण्यात महत्मा गांधी यांच्यावरील निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पण ही स्पर्धा होऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न केले. नवीन पिढीला महात्मा गांधी समजू नयेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आजची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’ चा मंत्र दिला होता. कोणत्याही परिस्थितीत देशातून धर्मांध शक्तीचे सरकार खाली खेचणे गरजेचे आहे. राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देश जोडण्याचे काम करत आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही व संविधान अबाधित ठेवण्याचा संकल्प आजच्या दिवशी करा, असे आवाहन करत नाना पटोले यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

माजी खासदार हुसेन दलवाई यावेळी म्हणाले की, महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्ष आघाडीवर होता, त्यांचे मोठे योगदान आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी लाठ्या काठ्या खाल्या, जेलमध्ये गेले, बलिदान दिले आणि काँग्रेस स्वातंत्र्यासाठी लढत असताना देशातील काही लोक मात्र ब्रिटीशांना साथ देत होते. स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात शेतकरी, कष्टकरी, महिला, गरिब, श्रीमंत यांना समान अधिकार दिले. दुर्दैवाने आज सत्तेतील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना बदलण्याचे काम करत आहेत, असे दलवाई यांनी सांगितले.

जरांगे पाटलांच्या केसालाही धक्का लावाल तर याद राखा.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना लाखो लोकांसोबत मुंबईत यावे लागले याला शिंदे-भाजपा सरकार जबाबदार आहे, या सरकारचे हे पाप आहे. जरांगे पाटील यांना रोखणार नाही असे सरकारने उच्च न्यायालयात सांगितले आहे. आरक्षण देणारच अशी भूमिका शिंदे-भाजपा सरकारने जाहीर करुन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्या मग अजून आरक्षण का दिले जात नाही. सरकार बनवाबनवी करत असल्याने मराठा समाजात तीव्र संताप आहे, त्यातून त्यांना मुंबईत यावे लागले. भाजपा सरकारकडे राज्यात व केंद्रात पाशवी बहुमत आहे मग आरक्षण देण्यात काय अडचण आहे. भाजपा सरकार आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज, ओबीसी, धनगर समाजाची चेष्टा करत आहे. तुम्हाला आरक्षण देता येत नसेल तर खूर्ची खाली करा, आम्ही आरक्षण देऊ असे म्हणत जरांगे पाटील यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी सरकारची आहे, त्यांच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा सरकारला सळो की पळो करुन सोडू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

नगर परिषद नोकर भरती प्रकरणी सरकारकडून दिशाभूल.
नगरपरिषदेतील नोकर भरतीमध्ये रिक्त सर्व संवर्गातील पदांची भरती करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. २०२२ च्या शासन आदेशानुसार शंभर टक्के भरती करण्यास मुभा असताना २०२३ साली काढण्यात आलेल्या नोकर भरतीत केवळ ४० टक्केच पद भरती केली जात आहे. १०० टक्के पद भरती करावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे मागणी केलेली आहे पण सरकार मुलांची दिशाभूल करत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला माजी खासदार हुसेन दलवाई, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्जा, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, मुनाफ हकीम, जोजो थॉमस, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी आमदार सुभाष चव्हाण, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलीस जवानांना शौर्य पदके

कारागृह विभागातील ९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर

अजित पवार यांनी आपल्या मुलाला समजावलं पाहिजे; खडसेंनी थेट अजितदादांना फटकारले