लाळघोटेपणा करणारा फडतूस गृहमंत्री राज्याला लाभलाय; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

ठाणे- ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यानंतर ठाण्यात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फडतूस गृहमंत्री म्हणत त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

रोशनी शिंदे मारहाणीप्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली नसून या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा दावा राजन विचारे यांनी केला आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली आहे. रोशनी शिंदे मारहाणीप्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली नसून राज्याला फडतूस गृहमंत्री लाभल्याचे उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवले.

“पोलीस आयुक्त सरकारचा घटक म्हणून वागत आहेत. फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री, नुसती फडणवीसी करणारा व्यक्ती गृहमंत्री म्हणून मिरवत आहे. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदाराने हल्ला केला तरीही ते हलायला तयार नाहीत. यांची गुंडगिरी वाढत चालली आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.