“रोशनी शिंदे गर्भवती नाहीत हे कळलं, पण पोटात लाथा मारण्याचं…”, उद्धव ठाकरेंचा संतप्त प्रश्न

ठाणे- ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री आपल्या कार्यालयातून बाहेर पडण्याच्या वेळी शिंदे गटाच्या १५-२० महिला कार्यकर्त्यांनी मिळून रोशनी शिंदे यांना मारहाण केली. या मारहाणीत त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

यानंतर ठाण्यात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

रोशनी शिंदे गर्भवती नव्हत्या, पण… – उद्धव ठाकरे
रोशनी शिंदे या गर्भवती नव्हत्या असा रिपोर्ट आला आहे. असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता उद्धव ठाकरे चांगलेच संतापले, रोशनी शिंदे या गर्भवती नव्हत्या असा रिपोर्ट आला आहे. पण मग पोटात लाथा मारण्याचं समर्थन कसं काय होऊ शकतं? रोशनी हात जोडून त्यांना सांगत होती की मला पोटात मारू नका तरीही त्यांना पोटात मारण्यात आलं. गयावया करणाऱ्या महिलेला अशा प्रकारे मारहाण करणाऱ्या लोकांना या ठाण्यात काय राज्यातच राहण्याचा अधिकार नाही. यांची गुंडगिरी वाढायला लागली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा गुंडमंत्री म्हटलं पाहिजे- उद्धव ठाकरे
जे काही प्रकार गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत ते पाहिले तर यांना मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा गुंडमंत्री म्हटलं पाहिजे. गुंडमंत्री मी म्हणत नाही. मात्र गुंडगिरीचाच हा सगळा प्रकार आहे. ही गुंडगिरी महाराष्ट्रात कशी काय चालली आहे? आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्यावेळी गुंड मंत्री असं नवं पद निर्माण करा असा टोलाही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून लगावला आहे. तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, पोलीस आयुक्तांना निलंबित करा अशाही मागण्या उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुंसक अशी टिपण्णी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेच हे सांगितलं आहे त्याची प्रचिती ठाण्यात आली आहे. मी गँग शब्द वापरला नव्हता. पण आता ठाण्यात महिला गुंडगिरी करू लागल्या आहेत. त्यामुळे देशाचं, राज्याचं आणि ठाण्याचं काय होणार? हा ठाणेकरां पुढचा प्रश्न आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे म्हणाले फडतूस गृहमंत्री
ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जातेय. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतायत की त्यांनी अशी कोणतीही कमेंट केली नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडीओ करून घेण्यात आला. तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलवून मारहाण करण्यात आली. मला वाटतं आता या प्रकरणी फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही. असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.