आपला देश धर्मानुसार चालला, तर आपला पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण होईल – राऊत

Sanjay Raut :  खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एक लक्ष्यवेधी वक्तव्य केले आहे. “आपला देश धर्मानुसार चालला, तर आपला पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक आणि सिरिया होईल,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. तसेच हा देश संविधानानेच चालला पाहिजे, असा आग्रह धरला. ते शुक्रवारी (७ एप्रिल) पुण्यात मराठी पत्रकार परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

संजय राऊत म्हणाले,  हा देश भारताच्या घटनेनुसारच चालला पाहिजे. जर देश धर्मानुसार चालला, तर या देशाचा पाकिस्तान होईल, या देशाचा इराण होईल, या देशाचा इराक होईल, या देशाचा सिरिया आणि म्यानमार होईल. बाळासाहेब ठाकरे हिंदुह्रदयसम्राट म्हणून ओळखले जातात. भाजपाचं हिंदुत्व नंतर आलं. त्यांचं हिंदुत्व चोरलेलं आहे. ते बोगस आहे.   इराणमध्ये अयोतुल्ला खोमनी हा इस्लाम धर्माचं राज्य घेऊन आला, तेव्हा इथं बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचा आवाज उठवत होते. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की, नक्कीच मी हिंदुत्वाचा विचार मांडतो, पण हा देश एक राहिला पाहिजे. हा देश सर्व जाती-धर्माच्या लोकांचा आहे. मला हिंदुंचा खोमेनी व्हायचं नाही. ही आमची परंपरा नाही, आमची संस्कृती नाही, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

धर्माचं राष्ट्र करणारे रिपब्लिक ऑफ इस्लाम खूप आहेत. ते देश धर्माच्या आधारावर उभे राहिलेत. मात्र, ती राष्ट्रे टिकली नाहीत. पाकिस्तान, बांग्लादेश, सिरिया, इराण, इराक, अफगाणिस्तान असे देश बघा. अफगाणिस्तान धर्माचं राष्ट्र आहे. तिथं तालिबानने काय केलं, असंही राऊतांनी नमूद केलं.