मराठा आणि ओबीसी आरक्षण रद्द होण्यास जबाबदार महाविकास आघाडी सरकारचा आरपीआय निषेध करणार

मुंबई – राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार (Dalit atrocities) रोखावेत तसेच पदोन्नती मधील आरक्षण लागू करावे यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उद्या दि.10 मे रोजी राज्यभर प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale) यांनी दिली आहे. रिपाइं(आठवले) पक्षातर्फे उद्या पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 12 वाजता विविध मागण्यांसाठी निदर्शने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रिपाइं चे पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण (Shailendra Chavan) यांनी दिली आहे. तर मुंबईत बोरिवली रेल्वे स्थानक जवळील तहसील कार्यालयावर रिपाइं तर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती रिपाइं उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव (Harihar Yadav) यांनी दिली आहे.

आंदोलनात रिपाइं तर्फे करण्यात येणाऱ्या मागण्या पुढीलप्रमाणे –

1.राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी.

2. ज्या झोपडीवासीयांनी सन 2019 च्या निवडणुकीत मतदान केले आहे अशा झोपडीवासीयांची झोपडी पात्र करावी. 2019 पर्यंत च्या झोपड्या शासनाने अधिकृत कराव्यात

3. राज्य सरकार ने नोकरी मधील मागासवर्गीयांचा अनुशेष भरावा

4. अनुसूचित जाती जमातींना मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करावे

5. मराठा समाजातील आर्थिक दुर्बल गरिबांना आरक्षण लागू करावे

6. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागास वर्गीय ओबीसी (OBC) समाजाला आरक्षण लागु करावे त्याबाबत सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडली नसल्यामुळे तसेच मराठा आरक्षण प्रश्नी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू राज्य सरकार ने मांडली नसल्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे त्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) राज्य सरकार चा निषेध करण्यासाठी आरपीआय तर्फे आंदोलन.

7. भूमिहीनांना कसण्यासाठी 5 एकर जमीन दिली पाहिजे.

8 – गायरान जमिनीवरील भूमीहीनांचे अतिक्रमण नियमित करण्यासाठी 14 एप्रिल 1990 च्या शासन निर्णयातील कट ऑफ डेट शिथिल करून 14 एप्रिल 2000 साला पर्यंत चे गायरान जमिनीवरील दलित भूमीहीनांचे अतिक्रमण नियमित करावे.

यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लीकन पक्षातर्फे उद्या मंगळवार दि.10 मे रोजी राज्य भर आंदोलन करण्यात येणार असून राज्यभरात प्रत्येक तहसील आणि जिल्हा अधिकारी कार्यालयावर निदर्शने मोर्चे काढून आंदोलन करण्यात येणार आहे.