सरकारला पाझर फुटेना; संभाजी राजे यांची तब्येत बिघडली; डॉक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या ह्या १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र आठ महिने उलटले तरी अजूनही त्या मागण्यांवर राज्य शासनाने कोणतीच अंमलबजावणी केलेली नाही. ठाकरे सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात आता असंतोष वाढू लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे २६ फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत. खरतर मराठा समाजाच्या मागण्या 15 दिवसात मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाचे अस्त्र पुकारणारे छत्रपती संभाजी राजे यांची आज तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिलाय. मात्र, राजे उपोषणावर ठाम आहेत. हा भावीपिढीच्या उज्वल भविष्यासाठीचा लढा असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. दुसरीकडे वर्षा बंगल्यावर राजे यांच्या उपोषणाबद्दल बैठक सुरू झालीय. या बैठकीसाठी राजे यांच्या वतीने एक शिष्टमंडळ उपस्थित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) या बैठकीत आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. मात्र, राजेंनी आता निर्वाणीचा इशारा दिल्यामुळे डॉक्टरांसह सारेच चिंतेत आहेत.