युक्रेनच्या सीमेवर सैनिकांकडून भारतीय विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

कीव – युक्रेनमधील युद्धाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत आपल्या देशातील लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत ७०० हून अधिक भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून युक्रेनच्या सीमेवर भारतीयांशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या युद्धाच्या परिस्थिती भारत भारतात परत येण्यासाठी निघालेल्या काही विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेवर मारहाण करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भारतीय विद्यार्थ्याने  हा व्हिडीओ बनवला आहे. पोलंड आणि हंगेरीच्या सीमेवर काही सैनिक भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे विद्यार्थी मदतीसाठी गेले असताना त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याने आता पालकांचीही चिंता वाढली आहे.

आतापर्यंत भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये सुरक्षित असल्याचे बोलले जात होते. भारतीय ध्वज असलेली वाहने मार्गस्थ केली जात असल्याचे काही व्हिडीओही समोर आले होते. मात्र रविवारपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये युक्रेनच्या काही सीमेवर सैनिक भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. पोलंड आणि हंगेरीच्या सीमेवर विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याने आता पालकही चिंतेत पडले आहेत. लवकरात लवकर मुलांनी मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करत आहेत.

 

दरम्यान, पोलंडच्या सीमेवर तैनात असलेल्या काही युक्रेनियन लष्कराच्या जवानांवर भारतीय विद्यार्थ्यांच्या एका गटाला जबरदस्तीने थांबवताना मारहाण केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप आहे. युक्रेनच्या सैनिकांनी सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली. तर धमकावण्यासाठी गोळीबार केल्याचाही आरोप आहे.