महाविकास आघाडीत धुसफूस : काँग्रेसमधील 20 आमदार थेट सोनिया गांधी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडणार

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये (MahaVikas Aghadi) अंतर्गत धुसफूस असल्याची दबक्या आवाजात चर्चा नेहमीच सुरु असते. या आघाडीत सामील असणाऱ्या तिन्ही पक्षांपैकी महत्वाचा असणारा काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा गेले अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात आता काँग्रेसमधील जवळपास 20 आमदार थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे गाऱ्हाणे मांडणार आहेत.

या आमदारांचं नेतृत्व भोरचे आमदार संग्राम थोपटे(sangram thopate) करत आहेत. त्यांच्याच लेटरहेडवर सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. थोपटे यांच्या लेटरहेडवर लिहिलेलं पत्र समोर आल्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. हे पत्र 22 मार्च रोजीचं असून त्यात 28 आमदारांची नावं आहेत. तर 20 आमदारांच्या सह्या आहेत. काँग्रेस आमदारांच्या(congress mla) या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. काँग्रेस आमदार नेमक्या कोणत्या कारणासाठी सोनिया गांधी यांना भेटणार आहेत यावरुन राज्याच्या राजकारणात तर्क वितर्क सुरु झाले आहेत.

दरम्यान, विरोधी पक्षांनी काँग्रेस सोबत शिवसेनेचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु केल्या असताना आमदार संग्राम थोपटे यांनी सारवासारव केली आहे. संसदेत प्रशिक्षण कार्यक्रम असल्यानं आमदार दिल्लीला जाणार आहेत आणि याच निमित्ताने सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी आम्ही वेळ मागितला आहे असं थोपटे यांनी सांगितले आहे.