आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही यात पडू नका; फडणवीसांना राऊत यांचा टोला

गुवाहाटी : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुरुवारी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली. यासोबतच विरोधी विचारसरणीच्या पक्षांशी युती केल्यामुळे गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना केडरकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला.सोबतच खासदार संजय राऊत यांची लुडबुड देखील अनेकांना खटकत आहे. या सर्व कारणांमुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकाविले असताना सुद्धा संजय राऊत यांची आक्रमक वक्तव्ये सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस बैठकांमधून आगामी परिस्थितीत काय पावलं उचलावीत, याविषयी सल्लामसलत करत असल्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांनी खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांना मी एक सल्ला देईन. तुम्ही या गोंधळात पडू नका. पुन्हा एकदा सकाळचं जे काही घडलं होतं, ते संध्याकाळचं होऊन जाईल. तुमची जी काही शिल्लक प्रतिष्ठा आहे, ती सांभाळून ठेवा. या गोंधळात तुम्ही पडू नका, फसाल. आमचं आम्ही बघून घेऊ, असं राऊत म्हणाले.